Step into an infinite world of stories
5
3 of 11
Short stories
मोझॅकचा अर्थ विविध रंगांनी, छोट्या-छोट्या तुकड्यांनी बनलेली, सुरचित अशी आरास. ही मोझॅक रचना सामाजिक पार्श्वभूमीवर रेखाटली आहे. या कथासंग्रहामध्ये, शैक्षणिक, वैद्यकीय, लेखन अशा विविध व्यवसायातील व्यक्तींची, त्यांच्या जीवनातील प्रसंगांमधून उलगडत गेलेली, भावनांची गुंफण साकारली गेली आहे. ‘गुड बॉय नावाचा चक्रव्यूह’, ‘मनःस्पर्श’ आणि ‘तोल’ या कथांच्या केंद्रस्थानी पुरुष व्यक्तिरेखा आहेत. बाकी सर्व कथा मध्यमवयीन स्त्री व्यक्तिरेखांभोवती गुंफलेल्या आहेत.
‘मितवा’, ‘इमोशनल डिस्कनेक्ट’, ‘अर्थ जगण्याचा’ या कथांच्या नायिकांना आयुष्याच्या एका वळणावर, स्वतःमधील सामर्थ्याची जाणीव झालेली दिसते. दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद बाजूला ठेवून, दुसऱ्यांसाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी जगणाऱ्या या नायिकांना, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असल्याचा साक्षात्कार या वळणावर होतो. सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यातही थोड्याफार फरकाने असे प्रसंग घडत असतात. त्यामुळे महिला वाचक, या कथांमधील नायिकांमध्ये स्वतःला शोधतील.
‘प्रतिबिंब’ आणि ‘नशा जिंकण्याची’ या कथांच्या नायिकांमध्ये द्वेष, मत्सर, असुरक्षितता, न्यूनगंड, उपकारांच्या ओझ्याखाली इतरांना मिंधे करून त्याचा उपयोग स्वार्थासाठी करून घेणे, अशा नकारात्मक भावनांचे प्राबल्य झालेले दिसते. अशा नकारात्मक भावना, स्वतःच्या मनात आल्या आहेत हे स्वीकारणे त्यांना कठीण झालेले दिसते.
‘निरागसता ते नीतिमत्ता’ आणि ‘बॉयफ्रेंड’ या कथांमध्ये नायिकांना त्यांच्या बालवयीन मुलांना घडवताना, त्यांच्यावर संस्कार करताना, त्यांना नीतिमत्तेचे धडे देताना, ‘पालक म्हणून कसे वागले पाहिजे’, याचे कोडे पडलेले दिसते. परंतु सारासार विचार केल्यानंतर, समुपदेशकाची मदत घेतल्यानंतर, त्यांना ‘पालकत्व कसे असावे’ याचे गूढ उकललेले दिसते.
‘माया - विदेशी आया’मधील नायिका निराशेच्या गर्तेत बुडून, आत्महत्या करायला प्रवृत्त होते. पण त्यातून सावरल्यावर, केवळ स्वतःसाठी नाही, तर तिच्यासारख्या इतर गरजू, एकाकी महिलांसाठी पैसा कमविण्याचा, परदेशातील भारतीय मुलांच्या आया बनून, मानाने जगण्याचा मार्ग दाखवते. या कथेतील नायिकेची भावनिक उदात्तता मनाला चटका लावून जाते. ‘गुड बॉय नावाचा चक्रव्यूह’ आणि ‘तोल’ या कथांमध्ये नायकांनी स्वतःभोवती अती चांगुलपणाचे, प्रामाणिकपणाचे कवच धारण केले आहे. स्वतःची ही आदर्शवादी, तत्त्ववादी प्रतिमा जपताना त्यांच्या मनातील नैसर्गिक भाव-भावनांचा कोंडमारा झालेला दिसतो. आयुष्यातील विशिष्ट वळणावर आल्यावर, हे कवच फोडून, कात टाकून हे नायक बाहेर पडले. ‘तोल’मधील नायकाने आणखी एक पाऊल पुढे जाऊन, कॅसिनोसारख्या व्यसनाच्या आहारी जाणारे त्याचे पाऊल वेळीच सावरले आणि स्वतःचा तोल सांभाळला. ही कथा यशाच्या शिखरावर असणाऱ्या बऱ्याच पुरुषांना भानावर आणणारी आहे.
‘मनस्पर्श’मधील नायकाचे नायिकेवर प्रेम आहे; परंतु तो तिच्या वडिलांच्या भावना समजून घेऊ शकत नाही. मात्र सावत्र मुलीवर इतके प्रेम करणारे, तिची काळजी घेणारे वडील, त्याच्या मनाला स्पर्श करून जातात, तेव्हा तो त्यांचा आदर करू लागतो. या कथेतील वडील वाचकांच्याही मनाला स्पर्श करून जातात.
समाजव्यवस्थेतील एकल पालकत्व, सावत्र पालकत्व, लिव्ह-इन रिलेशनशिप, इमोशनल डिस्कनेक्ट, यांसारख्या विषयावर कथा गुंफण्याचे काम या प्रतिभावान लेखिकेने केले आहे. संवेदनाशील माणसाच्या कुतूहलातून जन्माला आलेल्या या कहाण्या आहेत.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399661
Release date
Audiobook: 28 April 2023
English
India